नारायणगाव: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील रामकृष्ण हरी कापड दुकानातून एका भामट्याने सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने सुमारे ७ हजार रुपयाला दुकानदाराला गंडा घातला. ही घटना दि.१३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
शंकरराव सहकार मार्केटमध्ये असलेल्या एकनाथ डुकरे यांच्या मालकीच्या राम कृष्ण हरी या कापड दुकानात ५५ ते ६० वर्षीय एका भामट्याने दुकानातील कॅश काऊंटरवर २०० रुपये सुट्टे मागण्याच्या बहाण्याने कॅशियर महिलेला बोलण्यात गुंतवून अजून ३०० रुपये सुट्टे द्या असे सांगत काउंटरच्या आत येऊन गल्ल्यातील सुमारे ७ हजार खिशात घातले. हा प्रकार सायंकाळी दुकानातील हिशोब करताना उघडकीस आला.
दुकान मालक ज्ञानेश्वर डुकरे यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. या भामट्याने नारायणगावातील मुख्य बाजारपेठेत अनेक दुकानांमध्ये वयस्कर असल्याचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी सुट्टे मागून असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होऊ नये यासाठी कोणीही सुट्टे देऊ नये, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.