पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात 14 ऑगस्ट पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पहिला आणि दुसरा हप्ता असे 3 हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आज गुरुवारी पहाटे चार वाजता आणखी 48 लाख महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. याबाबत महिला व बालविकास महिला विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासंदर्भात तटकरे यांनी एक्स या समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे.
पुढे बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, “स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस 32 लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत एकूण 80 लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाला आहे. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत.”
दरम्यान, सध्या ट्रायल म्हणून रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. प्रत्यक्षात 17 ऑगस्टनंतरच लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात आतापर्यंत 1 कोटी 6 लाख 40 हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास 1 कोटी 36 लाख पात्र महिला आहेत. अजुनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरु आहे.