-योगेश शेंडगे
शिक्रापूर : पारोडी(ता. शिरूर) येथे बिबट्याने मध्यरात्री मेंढ्यांच्या कळपावरती केलेल्या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री दोन ते तीन च्या सुमारास घडली. या घटनेत शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दादाभाऊ शहाजी कोकरे (रा. सातकरवाडी पारोडी, ता. शिरूर) यांच्या घरासमोरील मेंढ्यांच्या कळपात मध्यरात्री आवाज येऊ लागल्याने, कोकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी कळपाकडे धाव घेत पाहिले. त्यावेळी बिबट्याने सहा फूट जाळी वरून प्रवेश करून त्यांच्या कळपातील मेंढीवर हल्ला करून सोबत घेऊन जाताना दिसून आला. ठार केलेली मेंढी दुसऱ्या दिवशी मृत अवस्थेत उसाच्या शेतात आढळून आली. सदर घटनेबाबत वनविभागाला कळवले असता त्यांच्याकडून पंचनामा करण्यात आला.
तळेगाव ढमढेरे, पारोडी, सातकरवाडी, येळे वस्ती, इंगळे नगर, दहिवडी, निमगाव म्हाळुंगी या परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे. परिसरात कुत्री, वासरे व शेळ्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु बुधवारी रात्री बिबट्याने पारोडी परिसरात अक्षरशः हैदोस घातला.
घरापुढील मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. लोकवस्तीमध्ये बिबट्याच्या असलेल्या बिनधास्त वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशातच गोठ्यामध्ये घुसून पाळीव जनावरांवर बिबट्या कडून होणाऱ्या या हल्ल्यामुळे अधिकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याचा तातडीने वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पारोडी ग्रामस्थ भयभीत झाले असून वन विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहे. मानवी वस्तीतील बिनधास्त वावरासह बिबट्याकडून वारंवार होणाऱ्या या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.