पुणे : आंबेगाव तालुक्यातील जवान सुधीर थोरात (वय 32) यांना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले.
एकुलत्या एक मुलाची प्राणज्योत मालवल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज लौकी चांडोली गावात त्यांची शासकीय इतमात अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.
ग्वाल्हेर येथे हॉर्स रायडिंग प्रॅक्टिस करत असताना मैदानामध्ये खाली पडलेला निशानी झेंडा सुधीर थोरत व्यवस्थित लावत होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या घोड्याची त्यांना धडक बसली.
या धडकेत घोड्याची टाप त्यांच्या डोक्याला जोरात लागल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
शहीद जवान सुधीर थोरात यांची BSF मध्ये पोस्टिंग होती. अश्वारोहन स्पर्धेत त्यांनी अनेक पदकांची कमाई केली आहे. ग्वाल्हेरमध्ये अशाच एका स्पर्धेसाठी गेलेले असताना घोड्याने धडक दिल्याने रविवारी त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि अवघा अडीच वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच आंबेगाव तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शहीद सुधीर थोरात यांचे पार्थिव सोमवारी रात्री मध्यप्रदेश येथून आणण्यात आले.