पुणे : पुण्यात किचन ट्रॉलीच्या कामाचे पैसे थकल्याने झालेल्या वादातून एका कामगाराने घरमालक महिलेचे सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून तिचा मोबाईल क्रमांक नमूद करून ‘कॉल गर्ल’ असे लिहून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बी. टी. कवडे रस्त्यावरील एका आलिशान सोसायटीत ८ ऑगस्ट रोजी घडला. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमान सियाक असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पतीसह बी. टी. कवडे रस्त्यावरील सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्या फ्लॅटमध्ये किचन ट्रॉलीचे काम करायचे होते. हे काम त्यांनी आरोपी हनुमान सियाक आणि त्याचा साथीदार कैलास यांना ४८ हजारात दिले. कामाच्या सुरुवातीला ४२ हजार रुपये गुगल पेद्वारे या दोघांना फिर्यादीने दिले होते. हे काम अपूर्ण राहिल्याने उर्वरित ६ हजार रुपये त्यांनी पाठविले नव्हते.
दरम्यान, राहिलेले काम कैलास याने पूर्ण केले. त्यामुळे फिर्यादीने त्याला ६ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. हे पैसे मलाच पाठवायचे असे हनुमान याने फिर्यादी आणि तिच्या पतीला सांगितले. हे काम कैलास याने केलेले असल्याने त्याला पैसे देऊ, असे फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरोपी हनुमानला सांगितले. त्यावरून आरोपीने त्यांच्याशी वाद घातला.
यानंतर हनुमान याने फिर्यादीच्या पतीच्या आणि फिर्यादीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. आरोपीने तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सॲप डीपीवर फिर्यादीचा फोटो ठेवला होता. त्याखाली फूल सर्व्हिस ५ हजार रुपये असा मजकूर लिहिला होता. तसेच या महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार केले. त्यावरदेखील असाच अश्लील मजकूर लिहिला होता. तसेच सोसायटीतील ब्रोकरच्या मोबाईलवरदेखील ‘कॉल गर्ल उपलब्ध’ असा मजकूर पाठवून बदनामी केली.
एवढच नाही तर फिर्यादीच्या पतीला व्हॉट्सॲप मेसेज व व्हीडीओ कॉलव्दारे संपर्क करून पैसे पाठवा, नाहीतर नग्नावस्थेतील महिलेच्या छायाचित्रावर फिर्यादीचा चेहरा लावून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेने पतीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.