धुळे : धुळे जिल्ह्यांमधून एक भयंकर बातमी समोर येत आहे. धुळे तालुक्यातील नगाव बसस्थानकाच्या मागे एका तरुणीने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली होती. नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी बराच वेळ फोनवर बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय तरुणीने माचिस देखील नागरिकांकडे मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर तरुणी ही मध्यप्रदेश येथील इंदोरमधील असल्याचे तिच्या बॅगेत मिळालेल्या आधार कार्डवरून उघडकीस आले आहे. तरुणीने स्वतःच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून घेतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नगाव स्टॉप जवळील निर्जनस्थळी तरुणी जळत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेपूर्वी तरुणी सीसीटीव्हीत कैद..
नगाव येथे अर्धवट जळालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून तरुणीचा घटनेपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज हाती आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळाजवळ तरुणी जवळपास एक ते दीड तास हॉटेलबाहेर थांबून असल्याचे दिसत आहे.