पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यामध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडली आहे. या तरुणाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सासरच्या कुंटुबातील सदस्यांसह सहा जणांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस तानाजी चाळेकर (वय 27, रा. बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत शिला तानाजी चाळेकर (वय 47, रा. नसरापूर, भोर) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ऐश्वर्या विजय पिंगळे, विजय नामदेव पिंगळे, शीतल विजय पिंगळे (सर्व जण रा. पौड, ता. मुळशी), ऋग्रीकेश उर्फ भाई सुनील खेडकर, सुनील शिवलिंग खेडकर, भूषण सुनील खेडकर (रा. नसरापूर, ता. भोर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
फिर्यादी शिला चाळेकर या आशा सेविका असून त्या बिबवेवाडी परिसरात आपल्या कुंटुबासोबत राहत असून 8 ऑगस्ट 2020 मध्ये त्यांचा मुलगा तेजस आणि ऐश्वर्या यांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. त्यानंतर तेजसच्या घरच्यांनी दोघांचे धार्मिक पद्धतीने सुद्धा लग्न लावून दिले होते. त्यांच्या लग्नानंतर दोन महिन्यातच त्यांच्यात नेहमी वाद व्हायला सुरवात झाली. कोरोनाच्या काळात तेजसचे दुकान बंद पडल्याने ऐश्वर्या आणि तेजस यांच्यातील भांडण विकोपाला गेले.
त्यानंतर मात्र ऐश्वर्याचे आई-वडील तिला माहेरी घेऊन गेले. चार महिने माहेरी राहिल्यानंतर पुन्हा ती सासरी आली. परंतु वाद कमी होत नव्हते. ऐश्वर्याने तिच्या घरी आई-वडिलांना बोलावून मोठा गोंधळ घातला. त्यानंतर तिने आपल्या आई- वडिलांच्या सांगण्यावरून तेजस विरोधात घटस्फोट व पोटगीचा दावा दाखल केला. तर ऋषिकेश खेडकर हा ऐश्वर्याच्या आई- वडिलांच्या सांगण्यावरून तेजसचा पाठलाग करत होता. तर सुनील खेडकर व भूषण खेडकर असे सर्व मिळून तेजसला मानसिक त्रास देत होते. अशी माहिती फिर्यादींनी दिली आहे.
आणि तो डिप्रेशनमध्ये गेला..
या सर्व गोष्टींमुळे तेजस हा डिप्रेशनमध्ये गेला होता. या सर्व त्रासामुळे चाळेकर कुटुंबीयांनी आपले घर बदलले. ते लोअर इंदिरानगरमध्ये राहण्यासाठी गेले. मात्र, 9 ऑगस्ट रोजी घरात कोणी नसताना तेजसने राहत्या घरातील पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.