नागपूर: “आई, मला माफ कर. दहावीचे वर्ष असल्यामुळे मी अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे होते; पण मी इन्स्टाग्रामच्या नादाला लागली. आता मला अभ्यासाची भीती वाटू लागली आहे, म्हणून मी आता जग सोडून जात आहे,’ अशी सुसाइड नोट लिहून एका पोलीस हवालदाराच्या दहावीत शिकत असलेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास हुडकेश्वरमध्ये उघडकीस आली. पूर्णा नीलेश ढोणे (१५, रा. महालक्ष्मीनगर, बाकडे सभागृहाजवळ, हुडकेश्वर) असे आत्महत्या केलेल्या मुलींचे नाव आहे. तिचे वडील नीलेश ढोणे हे नागपूर शहर पोलीस दलात गुन्हे शाखेत पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहेत.
हवालदार नीलेश ढोणे यांना दोन मुली असून मोठी मुलगी पूर्णा ही दहावीच्या वर्गात शिकते, तर लहान मुलगी आठवीत आहे. पूर्णाला दहावीचा अभ्यासक्रम कठीण वाटत होता. वर्गात शिकविलेले तिच्या लक्षात येत नव्हते. अभ्यासासह गृहपाठही नीट करता येत नव्हता. त्यामुळे पूर्णा ही गेल्या महिनाभरापासून नैराश्यात गेली होती. अभ्यास करताना तिला नेहमी नापास होण्याची भीती वाटत होती.
तसेच तिला मोबाईलवर इंस्टाग्रामवरील व्हिडीओ बघण्याचा छंद होता. त्यामुळे आईवडील वारंवार तिला अभ्यासावर लक्ष देऊन मोबाईलचा नाद सोडण्यासाठी सांगत होते. शाळेत गेल्यानंतरही तिचे अभ्यासात मन लागत नव्हते. नैराश्यात गेलेल्या पूर्णाकडे कुटुंबीयांचे दुर्लक्ष झाले. रविवारी रात्री दहा वाजता पूर्णाने आई व बहिणीसह जेवण केले आणि आपल्या खोलीत जाऊन झोपली. नैराश्यात असलेल्या पूर्णानी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
पहाटेच्या सुमारास झोपेतून उठलेल्या आईला पूर्णा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. आईने मोठ्याने हंबरडा फोडला. त्यामुळे अन्य कुटुंबीयसुद्धा जागे झाले. पूर्णाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पूर्णाने लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली. त्यानुसार हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.