लोणी काळभोर : जुना पुणे-सोलापूर महामार्ग उखडलेला असून त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना हे खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच भर म्हणजे या रस्त्यावर अनेक नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. रस्ता अरुंद झाल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून नागरिकांना अपंगत्व येत आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी पूर्व हवेलीतील नागरिकांनी केली आहे.
जुना पुणे-सोलापूर महामार्ग हा जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 होता. हा महामार्ग पुलगेट पासून सुरू होतो आणि पुणे कॅम्प, वानवडी, हडपसर, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, नायगाव पेठ, कोरेगाव मूळ व उरुळी कांचनपासून पुढे सोलापूरच्या दिशेकडे जातो. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा रस्ता गावाबाहेरून नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा रस्ता जुन्या महामार्गापासून 500 मीटर अंतरावर तयार करण्यात आला. जुन्या महामार्गाची वाहतूक नवीन महामार्गाकडे वळविण्यात आली. त्या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 असे नाव देण्यात आले आहे. तर नवीन महामार्गावरून वाहतूक सुरळीत सुरु झाल्यानंतर प्रशासनाने जुन्या पुणे-सोलापूर मार्गाकडे दुर्लक्ष केले.
जुन्या पुणे-सोलापूर महामार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यानंतर नागरिकांनी रस्त्याला खेटून घरी बांधली. तर काहींनी अतिक्रमणे करून मोठ्या दिमाखात दुकाने थाटली आहेत. या रस्त्यावर खड्डे पडलेले असून खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. तर नवीन पुणे-सोलापूर महामार्गाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.
शिक्षण, कामास जाणारे, व्यवसायाच्या निमित्ताने नागरिकांची या रोडने नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नेमका कोणता खड्डा चुकवायचा हेच समजत नाही. दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करत मार्गावरील खड्डे बुजवावेत. या रस्त्याच्या सबंधित येणाऱ्या आधिकारी वर्गाने व लोकप्रतिनिधी यांनी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, कारवाई करून अतिक्रमण काढल्यानंतर दोन्ही महामार्गाच्या बाजूला पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेणे हे अतिक्रमण विरोधी पथकाचे काम आहे. मात्र, रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा दुकाने थाटली जात आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचा ताफा, जेसीबसह कंत्राटदार कंपनीची वाहने आणि कर्मचारी यांच्यावर प्रशासन करीत असलेला खर्च व्यर्थ जात असल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणाच्या कारवाईनंतर त्याजागी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अतिक्रमणे कधी निघणार
जुना व नवीन पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे. शेवाळवाडी येथे महामार्गावरच काही नागरिकांनी दुकाने थाटली आहेत. तर लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथे काही नागरिकांनी रस्त्यावरच ताबा ठोकला आहे. उरुळी कांचन येथे हातगाडी, टपरी, फळे विक्रेते व पथारी व्यावसायिकांनी रस्त्यावरच थांबून विक्री चालू केली आहे. त्यामुळे दोन्ही महामार्गावरील अतिक्रमणे कधी निघणार? पुणे-सोलापूर महामार्ग मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.