केडगाव (पुणे) : प्रति जेजुरी मानल्या जाणाऱ्या देलवडी येथील खंडोबा देवाची पालखी व रासाई देवीची काठी प्रत्येक वर्षी दुसऱ्या श्रावणी, सोमवारी दौंड – पुरंदर सीमेवरील भुलेश्वर येथे स्नान व दर्शनासाठी घेऊन जातात. यावेळी पारंपरिक ढोल ताशा वादक तसेच हलगीच्या गजरात संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन दर्शनासाठी घेऊन जातात.
यावेळी 15 किलोमीटरचे अंतर भाविक पायी चालत जाऊन तब्बल 70 ते 75 वर्षाची धार्मिक परंपरा जोपासत आहेत. ही पालखी सोमवारी (ता. 12 रोजी) भुलेश्वर देवस्थान येथे मार्गस्थ झाली. परंतु एकेरीवाडी व रासाई नगर (शेलार वस्ती) येथील ओढ्यातून नागरिकांना पालखी घेऊन जावे लागत असल्याने प्रशासनाच्या विरोधात भाविकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. वर्षभर या ओढ्याला पाणी असते.
त्यात यंदा जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भाविकांना खडतर प्रवासाला सामोरे जावे लागले. येथील भाविकांना मागील अनेक वर्षांपासून जीव मुठीत घेऊन या ओढ्यातून खंडोबा देवाची पालखी, रासाई देवीची काठी, सबळ, ढोल, ताशा, पताका असे अनेक साहित्य घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील गावकऱ्यांनी या ओढ्यावर पुल व्हावा, अशी अनेक दिवसापासून मागणी केली होती. मात्र या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
खरतर अनेक वर्षांपासून ही परंपरा असल्याने भाविक याच मार्गाने भुलेश्वर येथे दर्शनासाठी जातात. त्यामुळे सालाबादप्रमाणे पालखी सोहळा याच ओढ्यातील पाण्यातून मार्ग काढत भुलेश्वरकडे मार्गस्थ होत आहे. प्रशासनाने भाविकांच्या भावनांशी न खेळता या ठिकाणी पुल बांधण्याची व्यवस्था करावी. पुल बांधण्यासंबधी प्रशासनाने गांभिर्याने विचार न केल्यास पुढील काळात भाविकांमध्ये संतापाचा उद्रेक झाल्याचे पाहावयास मिळेल, असे भविकांमधून बोलले जात आहे.
या पालखी सोहळ्यात भाविकांना पुलाअभावी अत्यंत खडतर प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे 70 ते 75 वर्षाची असलेल्या धार्मिक परंपरेला तडा जाऊ नये व पुलाअभावी कुठलीही जीवित हानी होऊ नये. त्यासाठी संबंधित प्रशासनाने भाविकांच्या भावना समजून यांचे गांभीर्य ओळखावे. तसेच पुलाचे काम लवकरात लवकर सुरु करावे.
– सचिन शेलार