लातूर: मागील दहा-बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी बँड पथकात सोबत काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये शनिवारी (दि.१०) मध्यरात्रीनंतर किरकोळ भांडण झाले. वाद विकोपाला गेला. यातून एका मित्राने दगड उचलून दुसऱ्याच्या कपाळावर मारून त्याचा खून केल्याची घटना शनिवारी १२.३० ते दीड वाजेच्या सुमारास लातूरच्या क्वॉईलनगर भागातील अजिंक्यतारा वसतिगृहाच्या बाहेर घडली. खून झालेल्या मयत तरुणाचे नाव सुखदेव मारुती रणसुळे (२७, रा. खोपेगाव, ता. जि. लातूर, ह. मु. क्वॉईलनगर, लातूर) असे आहे. या घटनेबाबतच्या अधिक माहितीनुसार मयत सुखदेव रणसुळे व त्याचा क्वॉईलनगर, लातूर येथील मित्र अजिंक्य ऊर्फ बांद्रया श्रीनिवास बासरे हे मागील दहा-बारा वर्षांपासून बँड पथकात एकत्र काम करीत होते. त्या दोघांची मैत्री होती.
अशातच शनिवारी (दि.१०) रात्री ते दोघेही अति दारू पिले होते. दारूच्या नशेत आरोपी अजिंक्य वासरे व मयत सुखदेव रणसुळे यांच्यात वादावादी झाली. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. त्यानंतर मयत सुखदेव हा क्वॉईलनगर वेथील अजिंक्यतारा वसतिगृहासमोरील रस्त्याच्या कडेला जाऊन झोपला. त्यावेळी त्याने मारल्याचा राग अनावर झाल्याने आरोपी नगरप अजिंक्य बासरे याने जवळचा मोठा दगड उचलून सुखदेवच्या कपाळावर मारला. यात गंभीर जखमी झालेल्या सुखदेव रणसुळे याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारच्या उत्तररात्री साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास घडली.