विशाल कदम
लोणी काळभोर : लोणीकाळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोमवारी (ता.१४) विविध सामाजिक उपक्रम राबवून बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
विद्यालयात स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी संस्थेच्या विश्वस्त मंदाकिनी काळभोर व प्रशासक प्रियांका सुभेदार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन काळभोर म्हणाले कि, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले.
चिमुरड्यांच्या लाडक्या ‘चाचा’ नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात ‘बालदिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने त्यांचा जन्मदिन ४ नोव्हेंबर भारतात बालदिन म्हणून साजरा करतात.
दरम्यान, बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विद्यार्थिनी पंडित नेहरू, भगत सिंग, राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, शकुंतला, शिक्षिका, शास्त्रज्ञ, मिस इंडिया इ. विविध भूमिकांचा पोशाख परिधान करून त्या व्यक्तिरेखा साकारण्यात होत्या.
या स्पर्धेत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी सोनिया कोतवाल व दिपक शितोळे यांनी परीक्षकांची भूमिका बजावली.
यावेळी शाळेच्या शिक्षिका प्रीती कदम यांनी ‘बालपण’ हि कविता सादर केली. तर पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रियांका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इत्तीसी हसी इत्तीसी खुशी’ हे गाणे सादर केले.
तर शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या प्रथम नितीन भट याचे शाळेच्या वतीने अभिनंदन केले. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी शिक्षिका पायल बोळे यांचे विशेष सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पूनम सिंग यांनी केले.