चीन : चीनमधील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी चक्क स्मशानभूमीतून 400 मृतदेह चोरल्याची घटना घडली आहे. स्मशानभूमीतून मृतदेह चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने 4000 हून अधिक मृतदेहांची तस्करी केली होती. या प्रकरणी 75 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या शांक्सी प्रांताचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. स्मशानभूमी आणि वैद्यकीय प्रयोगशाळेतून मृत लोकांचे मृतदेह चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीची पोलिसांना माहिती मिळाली. हे मृतदेह शांक्सी ऑस्टेरॉइड बायोमेडिकल आणि हेंगपू टेक्नॉलॉजी नावाच्या कंपन्यांना विकले गेले.
मृतदेह विकण्याची ही प्रक्रिया 2015-23 दरम्यान सुरू झाली असून यातून टोळीने किमान 75 कोटी कामवाल्याची माहिती मिळत आहे. चीनच्या सात राज्यात हा व्यवसाय सुरू असून मृतदेहांची तस्करी केली जात होती. तस्करी केलेल्या मृतदेहांची हाडे बाहेर काढून त्यांची विटंबना करण्यात येत होती. या प्रकरणात 75 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत स्मशान व्यवस्थापन अधिकारी, डॉक्टर आणि कंपनीचे अधिकारी यांचा समावेश आहे. या अहवालानंतर येथील नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.
या मृतदेहांच्या हाडांचा उपयोग गंभीर दुखापत झालेल्या आणि ज्यांच्या हाडांमध्ये खोल जखमा होत्या त्यांच्यावर उपचार करण्यासाठी केले जात होते. यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या हाडातून टिश्यू घेऊन त्यावर उपचार केले जात होते. साधारणपणे अवयवदात्याची परवानगी घेतली जाते. मात्र, या प्रकरणात मृतदेहांच्या हाडांशी छेडछाड करण्यात आली. तसेच या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीने शुल्क आकारले होते, मात्र त्यानंतरही हा गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे.