अहमदनगर : राज्यात मराठा-ओबीसी हा मुद्दा पेटला असून आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. आता आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी याआधी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
तसेच राज्यसभेची जागाही राष्ट्रवादीच लढेल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यात आपला खासदार आहे, भाजपसाठी आपण जागा सोडली त्यामुळे आता राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढेल अशी ठाम भूमिका अजित पवार यांनी मांडली.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक…
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकतीच एक बैठक पार पडली असून रात्री दीडपर्यंत बैठक चालली होती. गाव खेड्यातील महायुतीचा कार्यकर्त्यांचा समनव्य राहावा यासाठी 6 विभाग आणि मुंबई एक वेगळा विभाग या 7 विभागात आमचे एकत्रित मेळावे पार पडणार आहेत. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्याला हजर राहणार आहेत. 17 तारखेला आम्ही पुण्यात एक कार्यक्रम घेतोय. त्याच कार्यक्रमात महिलांना खात्यावर पैसे जमा होतील. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मेळावे पार पडणार आहेत, असेही अजित पवार म्हणाले.
मनोज जरांगेंवर बोलणे टाळले..
छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल, त्याचा उमेदवार पाडायचा, असं विधान मनोज जरांगेंनी शांतता रॅलीत केलं होतं. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. परंतु अजित पवार नो कमेंट्स म्हणत अजित पवारांनी उत्तर देणे टाळले.