मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सध्या राज्यभरात जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने महिलांशी संवाद साधत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचाही मेकओव्हर झाला आहे. गुलाबी रंगाचा वापर ठळकपणे करण्यात येत आहे. या मेकओव्हरबाबत विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार उत्तर देत असून यावेळी त्यांनी जाहीरपणे एक कबुलीही दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
तुम्ही मागील काही दिवसांपासून महिलांशी संवाद साधत असून तुमच्या मेकओव्हरची महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. यावर तुमचं मत काय आहे? असा प्रश्न एका मराठी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीदरम्यान अजित पवार यांना विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारण्याआधी मी आदरणीय नेते पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या वडीलधाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करता तेव्हा तुमच्यावर कसलीच जबाबदारी नसते.
ज्यावेळी तुमच्यावर जबाबदारी येते ना, तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे आजूबाजूच्या लोकांचं लक्ष असतं. आधी माझ्याकडून एखादी चूक झाली तरी साहेब ते सावरून घ्यायचे किंवा एखादं स्टेटमेंट देऊन त्यामधून मार्ग निघायचा. मात्र, आता तोलून मापून बोलण्याची माझ्यावर जबाबदारी आहे, अशी कबुलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मी गेलया ३५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे. सुरुवातीचा काळ आपला असतो, मात्र नंतर आपल्याही लक्षात येतं की नेमकं कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. मला एखादा निर्णय घेत असताना लोकांच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी लोकांमध्ये मिसळल्याशिवाय कळणार नाही, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.