नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रेला आज दिंडोरी मतदार संघातून सुरुवात झाली आहे. अजित पवार यांनी कार्यक्रमापूर्वी कादवा साखर कारखान्यावर श्रीराम शेटे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाशिक जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते श्रीराम शेटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात आजपासून सुरु होत आहे. त्यासाठी नाशिक येथून जन सन्माननीय यात्रा काढण्यात आली. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात त्याचा प्रारंभ झाला.
शरद पवार यांचे श्रीराम शेटे हे निकटवर्तीय आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर त्यांची चांगली पकड असल्यामुळे दिंडोरीचा आमदार कोण असेल? याबाबबत श्रीराम शेटे यांच्या भुमिकेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या भेटीला गेले असावे, अशी चर्चा सुरु आहे.
श्रीराम शेटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतरचे नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे पहिले जिल्हाध्यक्ष होते. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. मात्र श्रीराम शेटे यांनी कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांची साथ सोडणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यांना अनेक जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साथ दिल्याचा पाहायला मिळाले होते. आता मात्र शेटे यांनी आपली भूमिका बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा श्रीराम शेटे हे त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्यासंदर्भातील संकेत दिले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिंडोरी येथे पार पडणाऱ्या सभेच्या ठिकाणी श्रीराम शेटे यांचे मोठ-मोठे फ्लेक्स देखील लावण्यात आलेले आहेत.