पुणे : देशभरात चर्चेचा विषय ठरलेली पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या असून आता तिचे वडिल दिलीप खेडकरांच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आयएएस उमेदवारी रद्द केलेली आणि तत्कालीन प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिला जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे, यासाठी दबाव आणल्याने पूजा हिचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तहसीलदारांनी ही तक्रार दिल्याने दिलीप खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पुणे पोलिसांकडून या तहसीलदारांला जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. त्यांनी जबाब नोंदवल्यानंतर दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकरला स्वतंत्र दालन आणि इतर गोष्टी मिळाव्या यासाठी दिलीप खेडकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार आणि इतर कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.
नेमकं प्रकरण काय?
आपली मुलगी पूजा खेडकरला जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावं, कार्यालयातील कामकाजात शिपाई उपलब्ध करून देण्यासाठी दिलीप खेडकरांनी वर दबाव टाकला होता. याप्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यांनी दिलेल्या दोन पानी तक्रार अर्जाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. दीपक आकडे यांना जबाब नोंदविण्यासाठी आज (बुधवारी) बंडगार्डन पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र ते काल जाऊ शकले नाही अशी माहिती समोर आली आहे.