आग्रा : उत्तर प्रदेशात आग्रा येथे एका तरुणाने आपल्या लहान भावासोबत मिळून आपल्या गर्भवती पत्नीचा मित्रांशी सौदा केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीने या प्रकाराला विरोध केला असता तिला जबर मारहाण करून माहेरी पाठवण्यात आलं. आग्र्यातल्या शाहगंज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेने शाहगंज पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एत्मादुद्दौला इथल्या नगला देवजितमध्ये राहणाऱ्या अलीशी 23 फेब्रुवारी 2022 रोजी तिचा विवाह झाला. त्यानंतर ती सासरी गेली आणि सगळं काही सुरळीत चाललं होतं. अशातच तिच्या सासरच्या मंडळींनी हुंडा म्हणून कार आणि दोन लाख रुपये रोख रक्कम माहेरवरून घेऊन ये असा तगादा लावला. पीडितेच्या माहेरची मंडळी हुंडा देऊ शकत नव्हती. त्यामुळे तिला दररोज मारहाण करण्यास सुरुवात केली. असं असताना ती सासरीच राहिली.
दरम्यान, 12 डिसेंबर 2023 रोजी तिच्या पतीने तिला सांगितलं की, मी अडचणीच्या काळात माझ्या मित्रांकडून कर्ज घेतलं होतं. त्याची परतफेड करणं त्याला शक्य नाही. त्यामुळे तिला त्याच्या मित्रांची शय्यासोबत करावी लागेल. हे ऐकल्यावर तिला धक्काच बसला. तिने या गोष्टीला विरोध केला. त्यामुळे पतीने तिला पुन्हा मारहाण केली.
या घटनेच्या सहा महिन्यांनंतर 5 मे 2024 रोजीही पतीने तिच्याशी असंच वर्तन करून त्याच्या धाकट्या भावासोबत मिळून पीडितेला देहव्यापाराच्या व्यवसायात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती गर्भवती होती. तिने या वेळीही पतीला विरोध केला. त्यानंतर आरोपी पतीने पत्नीला मारहाण करून माहेरी पाठवलं. त्यानंतर त्रासलेल्या पत्नीने आग्रा पोलीस कमिशनर यांना भेटून न्यायाची मागणी केली. कमिशनरांच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.