पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील पोलिस दलात खांदेपालट करण्यात आली आहे. निवडणुका डोळयांसमोर ठेवून राज्यातील पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज बुधवारी (दि. ०७) पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे अधिकृत आदेश गृह विभागाकडून बुधवारी संध्याकाळी काढण्यात आले आहेत. यामध्ये राज्य पोलीस सेवेतील पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक दर्जाच्या बारा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त विजय मगर यांची लातूर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचीही पुण्यात बदली करण्यात आली आहे. तर लाच लुचपत विभागाचे नांदेड परिक्षेत्राचे अधीक्षक राजकुमार शिंदे यांची देखील पुण्यात वर्णी लागली आहे.
गृह खात्याने काल मंगळवारी (दि. ०६) राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे बदली सत्र सुरु असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरु आहे.