पुणे : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावळ पिंपरी गावात झालेल्या खुनातील आरोपीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या व नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून मुसक्या आवळल्या आहेत.
मन्ना उर्फ सुरज हर्जित सिंग (वय – २३, रा. हरदोचक बाम्बा, मंदिर म्हथ्रा, भागी तरण,पंजाब सध्या रा. वडोदरा, गुजरात) असे मुसक्या आवळलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला गुजरात येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावळ पिंपरी गावात रात्रीच्या सुमारास रोहिदास बाबुराव पाबळे (वय-३८, रा. पिंपरी कावळ) याची जमिनीच्या व जुन्या भांडणाच्या कारणावरून राहत्या घराचे पाठीमागे ४ ते ५ इसम यांनी कोयते, तलवारी तसेच अग्नीशस्त्र यांचे सहाय्याने मानेवर, डोक्यावर, पोटावर, पाठीवर मारून निर्घृण हत्या केली होती. याबाबत नारायणपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता.
सदर घडलेल्या घटनेच्या अनुशंघाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सदर घटनेचा तपास करीत असताना तांत्रिक मदतीच्या आधारे फरार आरोपी हा गुजरात राज्यात असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. तसेच आरोपी हा वेषांतर करून एका कंपनीत कामाला जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुजरात राज्यात तपास पथक रवाना करण्यात आले.
तांत्रिक मदतीचे आधारे व वेषांतर करून सदर आरोपीला कंपनीतून ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. नजीकच्या पोलीस ठाण्यात नेहून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदारांच्या मदतीने रोहिदास पाबळे यांचा धारदार शस्त्राने व अग्नीशस्त्र ( पिस्टल) यांचे मदतीने खून केल्याची कबुली दिली. गुन्हयाचे कामी इतर आरोपींना यापुर्वी अटक करण्यात आली असुन ते सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहे.
दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी दिली असून सदर गुन्हयाचा तपास नारायणगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक धनवे, नारायणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तापकिर, राजू मोमीन, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार वैदय, केंद्रे, पोलीस मित्र अक्षय ढोबळे, यांच्या पथकाने केली आहे.