Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिक मधून भारतीयांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताची विनेश फोगाट हिचे ऑलिम्पिक पदक हुकले आहे आणि तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. यामागील कारण असे की तिचे वजन वाढले असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश बिगर नामांकित म्हणून दाखल झाली आणि तिला आव्हानात्मक ड्रॉ मिळाला होता. पहिल्याच सामन्यात तिच्यासमोर टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई ससाकीचे आव्हान होते. पण, २९ वर्षीय विनेश फोगाटने अव्वल मानांकिस सुसाकीचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी युरोपियन विजेत्या ओक्साना लिव्हाच हिला पराभूत करत तिने उपांत्य फेरी गाठली आणि उपांत्य फेरीमध्ये पॅन अमेरिकन्स स्पर्धेतील विजेती युस्नेलिस गुजमनचे आव्हान परतवून लावले.
मिळालेल्या वृत्तानुसार भारतीय कुस्तीपटू ५० किलो वजनी गटात सहभागी झाली आहे आणि तिचे वजन हे १०० ग्राम अधिक असल्याचे समोर आले असल्याची माहीती मिळत आहे. त्यामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली आहे. स्पर्धेतील नियमानुसार फोगाटला रौप्यपदकही मिळू शकत नाही. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.