पुणे : राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले दोन आठवडे राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात सुद्धा मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सुद्धा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागात यलो अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा सुरु झाला आहे. त्यामुळं उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे पंढरपुरात पुराचा धोका वाढला असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.