लोणी काळभोर : घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. हेच कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील समाधान ईश्वर कसबे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे समाधान कसबेचे लोणी काळभोर सह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 ची परीक्षा 21 जुलै रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 1 ऑगस्ट 2024 रोजी लागला. या परीक्षेत समाधान याने 200 पैकी 186 गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तसेच त्याची राज्य राखीव पोलीस दलासाठी निवड झाली आहे. समाधान कसबे यांनी कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास केला. पहिल्यांदा अपयश आले, मात्र लगेच दुसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. त्याच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.
समाधानचे वडील ईश्वर कसबे व आई सुमन यांना तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्ये आहेत. ईश्वर कसबे हे वॉचमन म्हणून काम करतात. त्यांच्या एकट्याच्या जीवावर घर चालत नसल्याने, आई सुमन यांनीही काम करण्याचा निर्णय घेतला. आणि सुमन याही नागरिकांच्या घरी जाऊन धुणी-भांडीचे काम करू लागल्या. या दोघांच्या उत्पन्नावर कुटुंबाच्या आर्थिक गाडा हाकला जात आहे. ईश्वर कसबे व सुमन यांनी आर्थिक गणिते जुळवून दोन मुलींचा विवाह केला. तर मुलगा समाधान व मुलगी सलोनी यांना शिक्षण दिले.
समाधान कसबेचे प्राथमिक शिक्षण कदमवस्ती (ता. हवेली) जिल्हा परिषद शाळेतून घेतले. तर माध्यमिक शिक्षण पृथ्वीराज कपूर मेमरीवर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पूर्ण केले. तर समाधान हा आता समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेत आहे.
आपली घराची हलाखीची परिस्थिती पाहून आपणही शासकीय नोकरी मिळविली पाहिजे. व या गरिबीतून आपल्या कुटुंबाला बाहेर काढले पाहिजे. असे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न समाधानला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतर समाधानने 2022 साली पोलीस भरतीची तयारी केली. समाधानला राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेत अपयश आले. मात्र समाधान अपयशाने खचला नाही. जिद्द, मेहनत, संयम, चिकाटीच्या जोरावर पुन्हा जोरदार अभ्यास केला. आणि दुसऱ्याच प्रयत्नात यश संपादन केले.
दरम्यान, आई वडिलांनी कष्ट करून शिकविल्याने मुलाने कष्टाचे चीज केले आहे. समाधान कसबे यांच्या कागदपत्रांची नुकतीच पडताळणी झाली आहे. मेडिकल व ट्रेनिंग झाल्यानंतर तो लवकरच राज्य राखीव पोलीस दलात रुजू होईल. परिस्थिती नसताना समाधानने यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. समाधानच्या यशाबद्दल जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक, शासकीय क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील व शिक्षक आहेत. हे यश भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आई वडिलांच्या चरणी अर्पण करीत आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, अभ्यासात सातत्य ठेवा. तुम्हाला यश नक्की मिळेल.
– समाधान कसबे ( एसआरपीएफ परीक्षा उत्तीर्ण)