पुणे : पावसाने उष्णतेपासून दिलासा दिला असला तरी आता भारतावर एक नवीन विषाणूचे संकट निर्माण झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्याने आणि ओलसर वातावरणामुळे भारतात झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यात पुणे शहरात आतापर्यंत झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण सापडले आहेत. 26 गर्भवती महिलांना देखील झिका विषाणूची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात खबरदारी घेतली जात आहे.
पुण्यात झिका बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात झिका बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेचे आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवा. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीसुद्घा त्यांच्याकडे अशा प्रकारचे रुग्ण दिसून आल्यास त्याचा नमुना एनआयव्ही येथून तपासून घ्यावा. याबरोबरच घरातील आणि गावातील सर्व पाणीसाठे वाहते करावेत. पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत. रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
झिका व्हायरसची लागण कशी होते?
झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. तसेच एडीस इजिप्ती डासामुळे झिका हा रोग होतो. हा रोग एडिस डासाच्या चावण्यानं पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. या व्हायरसमुळे होणारा संसर्ग अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका पसरवू शकतो. त्यामुळे झिका व्हायरसची लक्षणं दिसत असतील तर तात्काळ खबरदारी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करा.
झिका व्हायरसची लक्षणं कोणती?
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात.