पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलेच राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे.
अशातच माजलगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करीत गावागावात सभा घेत असतानाच सोळंकी यांनी ही घोषणा केलेली आहे. यावेळी सोळंके यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली.
सोळंकी यांनी आपली राजकीय निवृत्ती घोषित करतानाच आपला वारासदारही जाहीर केला आहे. पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक जयसिंह लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान भाऊ धैर्यशील सोळंके यांचे हे चिरंजीव आहेत. गेल्या वर्षापासून जयसिंह सोळंके राजकारणात सक्रीय आहेत. प्रकाश सोळंकेंसोबत राजकारणात त्यांची एन्ट्री घेतली. जययसिंह हे जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती आहेत. ब-याच वर्षापासून राजकारणात सक्रीय असल्यामुळे बीड मतदारसंघात त्यांचा चांगलाच जनसंपर्क आहे. त्यामुळे भविष्यात तेच माजलगाव, वडवणी आणि धारुर तालुक्यात राष्ट्रवादी पुढे नेणार अशी चर्चा सुरु झाली होती.
जयसिंह सोळंके हे धारूर पंचायत समितीचे उप सभापती, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. आता अजित पवार याला मान्यता देतात का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.