पुणे : राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर अजूनही कायम आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे आणि नाशिक या भागात रविवारी झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे नाशिकमधील गोदावरी आणि पुण्यातील मुळा-मुठा नदीला पूर आला आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. राज्यात पावसाचा जोर अजूनही चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
गंगापूर धरणातून विसर्ग..
नाशिकमध्ये गेल्या 24 तासांत 104 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकच्या गोदावरीला हंगामातील हा पहिला पूर ठरला आहे. गोदा घाट परिसरातील दुतोंडी मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी गेली आहे. नाशिकमध्ये पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुण्यात पाणीच पाणी..
पुणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने पुण्यातील एकता नगर भागात अजूनही पाणी आहे. या ठिकाणाच्या सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी रविवारपासून एकता नगरमध्ये मुक्कामी आहेत. पुण्यात सध्या पावसाचे विश्रांती घेतली असली तरी एकता नगरमधील परिस्थिती जैसे थे आहे.
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर जलमय..
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर अजूनही पाण्याखाली गेले आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुठा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह अद्यापही सुरू आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे भाविकांना दर्शन घ्यायला अडचण येत आहे. मंदिर प्रशासनाकडून अद्यावत पूजा विधी करण्यात आला आहे.
#WATCH | Maharashtra: Various temples were inundated under the Godavari river in Nashik, following incessant rainfall in the region. pic.twitter.com/oHjGYbTvDs
— ANI (@ANI) August 5, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर
पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमधील पाहणी करत मुख्यमंत्री साधणार नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे शहरात उद्धवलेल्या पूर सदृश्य परिस्थितीचा मुख्यमंत्री आज आढावा घेणार आहेत.
राज्यात चार दिवस पावसाचे..
राज्यात अजून चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही भागांत यलो अलर्ट दिला आहे.