पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवेची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती १३, १४ व १६ ऑगस्ट या कालावधीत मुंबईतील एमपीएससीच्या कार्यालयात होणार आहेत. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहावे, असे एमपीएससीकडून कळवण्यात आले.
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुलाखतीकरिता उपस्थित राहताना रुग्णालयाकडून वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असल्याचे जबाबदार अधिकाऱ्याची सही व शिक्क्यासह प्रमाणित केलेले तपासणी पत्र मुलाखतीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.