पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसानंतर (Weather Update) आता पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज 12 एप्रिल रोजी राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार असून कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एप्रिलच्या या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत.

*कोकण किनारपट्टीवर उष्ण व दमट हवामान*
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्णतेसोबतच आर्द्रता वाढल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. हवामान विभागाने आज कोकण किनारपट्टीसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत पुढील काही दिवस किमान आणि कमाल तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांना उन्हापासून बचावासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून पुण्यातही हीच स्थिती पाहायला मिळत आहे.
*विदर्भ आणि मराठवाड्याची स्थिती*
विदर्भातील अकोला, चंद्रपूर आणि नागपूर या शहरांमध्ये तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. अकोल्यात तापमानाची नोंद 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही उन्हाचा चटका कायम असून शेतीकामांवर याचा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे आधीच नुकसान झाले असताना आता वाढत्या उष्णतेमुळे उरलेली पिके वाचवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. दरम्यान, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवसांचा अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहील. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही तापमानात वाढ होणार आहे. एप्रिलच्या अखेरीस उष्णतेची तीव्रता अधिकच वाढणार असल्याने प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत.







