पुणे: पुणे शहर आणि परिसरात मार्च (Pune Weather) महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळा तीव्र होताना दिसत आहे. आज, 6 मार्च रोजी पुण्याचे कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने शहरात उकाडा वाढला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभर आकाश प्रामुख्याने निरभ्र राहणार आहे. सकाळच्या वेळी हवेत किंचित गारवा असला, तरी सकाळी 11 वाजेनंतर उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे. लोहगाव आणि कोरेगाव पार्क यांसारख्या भागांत तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदवला जात आहे.

वाढत्या उष्म्यासोबतच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 30 ते 33 टक्क्यांच्या दरम्यान आहे. दुपारच्या वेळी नागरिक संरक्षणासाठी सनकोट, गॉगल आणि टोप्यांचा वापर करताना दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे आरोग्य जपण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
पुढील सात दिवसांचा अंदाज वर्तवताना हवामान खात्याने म्हटले आहे की, पुण्याचा पारा 38 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारी उन्हाची तीव्रता अधिक राहू शकते. अरबी समुद्रावरील हवेच्या स्थितीमुळे येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असली, तरी तूर्तास पुणेकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत.







