पुणे: पुणे (Pune Weather) शहरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका अचानक वाढला आहे. आज सकाळी शहराच्या काही भागांत किमान तापमानाची नोंद 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान झाली असून, पहाटेपासूनच शहरावर धुक्याची चादर पाहायला मिळाली. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे पुण्यातील हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला असून, सकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

पुण्यातील पाषाण, कोथरुड, आणि शिवाजीनगर भागात आज सकाळी दृश्यमानता कमी झाल्याचे जाणवले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने आणि वारे शांत असल्याने हवेत गारवा कायम आहे. विशेषतः लोहगाव आणि हवेली परिसरात हुडहुडी जास्त जाणवत असून, संध्याकाळनंतर थंडीचा जोर अधिकच वाढत आहे.
पुणे हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील 24 ते 48 तास पुण्यात थंडीचा कडाका असाच कायम राहणार आहे. शहराच्या काही उपनगरांमध्ये तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या शनिवारपासून ढगाळ वातावरण निर्माण होण्याची चिन्हे असल्याने थंडीचा जोर किंचित कमी होऊ शकतो. तोपर्यंत पुणेकरांनी गुलाबी थंडीचा आनंद घेतानाच स्वतःच्या आरोग्याचीही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.







