पुणे : गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या ज्येष्ठा गौरींच्या आगमनाची तयारी घराघरांत सुरू झाली आहे. यंदा १७ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे आवाहन करण्यात येणार असून, १८ सप्टेंबरला गौरी पूजन आणि १९ सप्टेंबरला त्यांना निरोप दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत ज्येष्ठ गौरींची पूजा करण्याच्या पद्धती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी त्यांना पार्वतीचे, तर काही ठिकाणी महालक्ष्मीचे रूप मानले जाते. गणपती उत्सवाच्या काळात त्यांचे आगमन होत असल्याने त्यांना गौरी-गणपती असेही म्हटले जाते.

ज्योतिषी तृप्ती भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठा गौरींच्या आगमनामुळे घरात सुख-शांती येते आणि संकटे दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. तीन दिवस गौरींची मनोभावे पूजा आणि सेवा केली जाते. १७ सप्टेंबरला गौरी आवाहनाचा मुहूर्त असून, सायंकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत आवाहन करता येणार आहे.
१८ सप्टेंबरला गौरी पूजन केले जाणार आहे. या दिवशी दिवसभरात कोणत्याही वेळी घरच्या परंपरेनुसार गौरींची पूजा करता येईल. त्यानंतर १९ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरींना निरोप दिला जाईल. विसर्जनासाठी सकाळी ६ वाजून २७ मिनिटांपासून सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंतचा मुहूर्त देण्यात आला आहे.

धार्मिक मान्यतेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी तीन दिवसांसाठी माहेरी येतात. त्यामुळे त्यांचे घरातील मुलींप्रमाणे स्वागत केले जाते. गौरींच्या आगमनापूर्वी घर आणि देवघराची स्वच्छता केली जाते. दारापासून गौरी बसविण्याच्या ठिकाणापर्यंत रांगोळी काढली जाते. काही घरांमध्ये लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढून गौराईंचे स्वागत करण्याची परंपरा आहे.

आवाहनाच्या वेळी प्रथम श्री गणेशाचे स्मरण करून गौरींचे घरात स्वागत केले जाते. त्यानंतर गौरींची सजावट करून नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी मुख्य पूजन करून घरच्या परंपरेनुसार पुरणपोळी, चवळीची भाजी, वरण-भात आदी पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तिसऱ्या दिवशी पूजा करून गौरींना भावपूर्ण निरोप दिला जातो.







