करमाळा: करमाळा तालुक्यातील कुंभारगावात सध्या एकच चर्चा सुरु आहे, ती म्हणजे ‘वृक्षवर्धिनी मोहिमेची’! झाडे लावा झाडे जगवा.
पानी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धा २०२३ चे राज्यविजेतेपद पटकावत गावाने एक आगळी वेगळी छाप संपूर्ण महाराष्ट्रात सोडली आहे. विजेता गट कुंभारगाव अॅग्रो प्रोड्युसर कंपनी शेतकरी गटाची प्रेरणा घेत गटशेतीची चळवळ इथे भक्कम उभी राहिली आहे. फार्मर कप स्पर्धेतील एकूण ४ गटांमधील ११ सदस्यांनी श्रमदानातून परिसरातील स्वच्छता, वृक्षलागवड, जल व्यवस्थापन, वृक्ष संवर्धन इ. कामे करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी १० आठवडे झाले कामाला सुरुवातही केली आहे.

शेतकरी सांगतात, “पानी फाउंडेशनमुळे आम्हाला पर्यावरण संवर्धनाबाबत योग्य दिशा मिळाली. गेली २ महिने, आम्ही दर रविवारी सकाळी एक तास श्रमदान करतो. आतापर्यंत तालुक्याला जाणाऱ्या रस्तावरील रोपांचे जतन केले आहे. शेजारी वाढलेले गवत काढले, त्याला आळे घातले आणि पाणी देण्याचे कामही सुरु आहे. आता वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिम हाती घेणार आहोत. ५० गावकऱ्यांनी श्रमदानासाठी नोंदणी करुन रोपे, अवजारांची मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे.” पर्यावरण संवर्धन काळाची गरज”ओळखून सर्वांनी ही मोहीम हाती घेतली आहे. या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे







