करमाळा: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुंभारगाव येथे दुपारनंतर घडलेल्या एका घटननेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगल शशिकांत साळुंखे या महिला संध्याकाळी साधारणपणे 5 वाजता शेतातून घरी परतत असताना तीन अनोळखी चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील सोने हिसकावून नेले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावडीच्या दिशेने आलेल्या या तिघा चोरट्यांनी प्रथम मोटारसायकल आडवी लावून महिलेचा रस्ता रोखला. त्यानंतर त्यांनी अचानक तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि जिंतीच्या दिशेने पळ काढला. या वेळी महिलेने आरडाओरडा केला, परंतु त्या ठिकाणी शेतात इतर कोणी नसल्याने चोरट्यांनी सहजपणे पलायन केले. यानंतर घाबरलेल्या महिलेने घरी जाऊन संपूर्ण घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली.
त्यानंतर तातडीने चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी देलवडी हद्दीतील हॉटेल शौर्य येथे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिघा चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसून आले आहेत. फुटेजनुसार ते पुढे जिंतीच्या दिशेने निघाल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरातील महिलांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे चोरट्यांच्या वाढत्या धाडसाचे चित्र उघड झाले आहे. करमाळा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चोरट्यांचा छडा लावण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







