बार्शी, दि. 17: बार्शी शहर पोलीस (Solapur News) ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका युवकाला गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेतले आहे. हि कारवाई राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसर, सोलापूर रोड येथे करण्यात आली.

रोहित संतोष मारकड (वय 21, रा. उपळाई (रमाळा), ता. कळंब, जि. धाराशिव, सध्या रा. चोरमोले प्लॉट, बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझीनसह) आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर त्यांच्या पथकाला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, सोलापूर रोड परिसरातील राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसरात आरोपी रोहित मारकड याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आहे.
सदरची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी रोहित मारकड यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडतीदरम्यान त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझीनसह) आणि एक जिवंत काडतूस विनापरवाना बेकायदेशीररीत्या आढळून आले. त्यानुसार मारकड याच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 (25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार प्रविण साठे, अमोल माने, सचिन देशमुख, अंकुश जाधव, अजीज शेख, पोलीस शिपाई बाळकृष्ण मुठाळ, अविनाश पवार, राहुल उदार, सचिन नितनात, इसाभिया बहिरे, सतीश उघडे, वैभव भांगे यांनी केली.
नागरिकांना आवाहन
अवैध शस्त्रे व संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल. शहराच्या सुरक्षेसाठी पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







