करमाळा: श्री मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी ता. करमाळा जि. सोलापूर येथील कारखान्यास एनसीडीसीकडून 140 कोटी कर्ज मागील तीन महिन्यापूर्वीच मिळाले असून सदर कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने प्रशासन हालचाल करत असताना कर्मचाऱ्यांची एक रुपयाची देणे न देता त्यांना विश्वासात न घेता कामकाज सुरू असून सन 2016 पासून 2023 पर्यंत कर्मचाऱ्यांचे 40 ते 45 पगार थकले आहेत.

त्याचबरोबर 2016 पासून चा पीएफ कारखाने भरला नाही . तसेच जे कामगार रिटायर झाले आहेत त्यांचा पीएफ न भरल्यामुळे त्यांच्या पेन्शनही सुरू होऊ शकत नाहीत, तसेच मयत कर्मचारी यांनाही मयत फंड मिळाला नाही. कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसी पूर्णपणे बंद पडल्या आहेत. याच अनुषंगाने कर्मचारी वारंवार आपल्या हक्काच्या थकीत पगारासाठी कारखान्यावरती आंदोलन करत आहेत परंतु कारखाना प्रशासन तारीख पे तारीख देत कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आज दि:29 रविवार या दिवशी 190 कर्मचारी यांनी ठराव घेऊन थकीत पगार जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत कामावर न येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अगोदर द्या आमच्या कामाचे दाम नंतर सुरु करू काम याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.








