कोल्हापूर: कोल्हापूरला आयटी हब बनवण्यासाठी गेल्या 12 वर्षांपासून सुरू असलेले प्रयत्न आता अधिक वेगाने होत आहेत. प्रशासनाने सुरुवातीला IT पार्कसाठी शेंडा पार्कमधील कृषी विभागाची 30 एकर जागा निश्चित केली होती. मात्र, ही जागा भविष्यात होणाऱ्या विस्तारीकरणासाठी अपुरी पडेल असे लक्षात आल्यामुळे, आता उद्योग विभागाने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गालगत नव्या जागेचा शोध सुरू केला आहे.
कोल्हापुरात आहे अनेक IT कंपन्या
पुणे आणि बंगळुरू या दोन मोठ्या आयटी हब शहरांच्यामध्ये असलेल्या कोल्हापूर शहरात सध्या 350 हून अधिक IT कंपन्या कार्यरत आहेत. यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे लक्ष कोल्हापूरकडे वेधले गेले आहे. अनेक कंपन्यांनी येथे येण्याची तयारी दर्शवली आहे, पण त्यांच्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
बाहेरून येणाऱ्या कंपन्यांना आणि भविष्यात वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी उद्योग विभाग आता कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गालगत योग्य जागेच्या शोधात आहे.







