सांगली: सांगली जिल्ह्यातील शेटफळे येथे ८३ वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या अंगावरील दागिने लुटल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात महिलेचाच नातजावई आरोपी असल्याचे तपासात उघड झाले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेश दिलीप गायकवाड (वय ३०, रा. बलवडी, ता. खानापूर) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मालन मारुती जाधव (वय ८३) या शेटफळे येथे राहत होत्या. ३० जूनच्या पहाटे आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून प्रथम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.

यावेळी मालन जाधव यांनी विरोध केल्याने आरोपीने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना ३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज किंवा ठोस भौतिक पुरावे उपलब्ध नसल्याने तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरला होता. तरीही पोलिसांनी तांत्रिक तपास, स्थानिक माहिती आणि मृत महिलेने शुद्धीवर असताना दिलेल्या माहितीनुसार तपासाची दिशा निश्चित केली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मालन जाधव यांच्याकडे शेटफळे आणि माहेरच्या गावातील मालमत्ता होती. त्यांनी काही मालमत्ता नातवाच्या नावावर केल्यामुळे कुटुंबात नाराजी होती, अशी माहितीही पोलिसांना मिळाली. याच कारणातून आरोपीने हा गुन्हा केल्याचा संशय बळावला.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी राजेश गायकवाड याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून लुटलेले दागिने जप्त करण्यासह पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा उलगडा करताना पोलिसांनी प्रत्यक्ष साक्षीदार किंवा सीसीटीव्ही नसतानाही विविध धागेदोरे जोडून आरोपीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले आहे.








