अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगरगण (Ahilyanagar Crime) परिसरातील वांबोरी घाटात दोन दिवसांपूर्वी गोणीत भरलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. दरीकाठावर (Ahilyanagar News) टाकलेल्या त्या गोणीतील मृतदेहाची ओळख पटवणे हे सुरुवातीला पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि स्थानिक चौकशीच्या आधारे या प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसांत उलगडा झाला आणि धक्कादायक सत्य समोर आले.

मृत व्यक्तीची ओळख किरण शिवाजी कवाने अशी पटली. त्याचा खून त्याचाच सख्खा भाऊ योगेश शिवाजी कवाने याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वडील शिवाजी शंकर कवाने यांनीही मदत केल्याचे उघड झाले. बाप-लेकांनी मिळून मृतदेह दोन गोण्यांत भरला, मधून शिवण घातली आणि तो वांबोरी घाटात फेकून दिला.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, किरण दारूच्या नशेत वारंवार आई-वडिलांना मारहाण करत असे. कुटुंबीयांनी त्याला समज देण्याचे आणि व्यसनमुक्त करण्याचे प्रयत्न केले होते; मात्र त्याच्या वागण्यात बदल झाला नव्हता. घटनेच्या दिवशीही तो नशेत घरात गोंधळ घालत असताना भाऊ योगेश याच्याशी वाद झाला. संतापाच्या भरात योगेशने त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे.







