पुणे: इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित (Bhigwan Kidnapping Case) अपहरण प्रकरणाला आता स्पष्ट राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणात दौंडचे भाजप आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांचे नाव चर्चेत आले असून तरुणीच्या आईसह नातेवाईकांनी त्यांच्यावर (Bhigwan News) गंभीर आरोप केले आहेत. आरोपींना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

तरुणीच्या आईचा आरोप आहे की, आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांनी मोबाईल स्टेटसवर राहुल कुल यांचा फोटो ठेवून “सदैव एकनिष्ठ” असा मजकूर टाकला आहे. “आमदार राहुल कुल आरोपींना मदत करत आहेत. मीही त्याच तालुक्यातील आहे, तरी मला भेटण्याची तसदी त्यांनी घेतली नाही,” अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. मुलगी परत यावी यासाठी इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांनी मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणात यापूर्वी तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात तिने आपण स्वतःच्या इच्छेने संबंधित तरुणासोबत गेल्याचे म्हटले होते. मात्र कुटुंबीयांचा दावा आहे की ती दबावाखाली बोलत आहे. दरम्यान, भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आरोपींना राजकीय संरक्षण असल्याचा सूचक आरोप करत एका नातेवाईकाच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा दाखला दिला.
या सर्व घडामोडींमुळे भिगवण प्रकरण केवळ कौटुंबिक वादापुरते मर्यादित न राहता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. आमदार राहुल कुल यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ते आपली भूमिका कशी मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







