मुंबई: आयपीएल 2026 मध्ये संजू सॅमसन याने दमदार शतक झळकावत हंगामातील पहिलं शतक आपल्या नावावर केलं आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेली ही खेळी केवळ प्रभावीच नव्हे, तर ऐतिहासिक ठरली आहे. (Sanju Samson First Century CSK IPL 2026)

शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना सॅमसनने अवघ्या 52 चेंडूत शतक पूर्ण केलं. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद सेंचुरी ठरली. याआधी त्याने 2019 मध्ये 54 चेंडूत शतक झळकावलं होतं, मात्र यावेळी त्याने स्वतःचाच विक्रम मोडत नवी उंची गाठली.

विशेष म्हणजे, चेन्नई सुपर किंग्स कडून खेळताना सॅमसनचं हे पहिलंच शतक ठरलं. त्यामुळे ही खेळी त्याच्यासाठी आणखी खास बनली आहे. त्याच्या या शतकामुळे आयपीएल 2026 मधील पहिल्या शतकाचा मानही त्यालाच मिळाला.

या हंगामात यापूर्वी सर्वोच्च धावसंख्या के. एल. राहुल (92 धावा) आणि समीर रिझवी (90 धावा) यांच्या नावावर होती. मात्र, सॅमसनने शतक झळकावत सर्वांनाच मागे टाकलं.
सॅमसनची ही खेळी आणखी महत्त्वाची यासाठी ठरते, कारण हंगामाच्या सुरुवातीला त्याची कामगिरी निराशाजनक होती. पहिल्या तीन डावांत त्याने केवळ 6, 7 आणि 9 अशा मिळून 22 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती.
मात्र, या एका शतकी खेळीनं सॅमसनने टीकाकारांना जोरदार उत्तर दिलं आणि पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. त्याच्या या खेळीमुळे संघालाही मोठी उभारी मिळाली असून, पुढील सामन्यांसाठी त्याचा आत्मविश्वास निश्चितच वाढलेला दिसत आहे.







