पुणे : पुण्याजवळील यवत पोलिसांनी तंत्रज्ञानाचा अचूक वापर करत एक उल्लेखनीय कामगिरी फत्ते केली आहे. नागरिकांचे विविध ठिकाणी गहाळ झालेले तब्बल 25 महागडे स्मार्टफोन शोधून काढत पोलिसांनी ते सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या या सर्व मोबाईलची एकूण बाजारभावानुसार किंमत सुमारे 5 लाख 75 हजार रुपये इतकी आहे. ऐनवेळी हरवलेला मौल्यवान मोबाईल पुन्हा हातात पडल्यामुळे नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि त्यांनी यवत पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

मोबाईल गहाळ झाल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने या समस्येवर तांत्रिक उपाय शोधला. केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ (CEIR) या विशेष पोर्टलचा प्रभावी वापर करून पोलिसांनी ही व्यापक शोधमोहीम हाती घेतली. केवळ महाराष्ट्राच्या हद्दीतच नव्हे, तर इतर राज्यांत पोहचलेल्या मोबाईलचा ठांगपत्ता लावण्यात तपास पथकाला यश आले. सायबर विश्लेषण, मोबाईलचे स्थान ट्रॅक करणे आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या जोरावर हे यश संपादन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला याकामी विशेष सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.

या मोहिमेच्या यशस्वितेमध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड यांच्यासह पोलीस अंमलदार महेंद्र चांदणे, संदीप देवकर, रॉकी देवकाते, मारुती बाराते, धीरज जाधव, अमोल भुजबळ, सचिन गुंड, शुभम मुळे आणि दिनेश पोळ यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळवून देण्यासाठी यवत पोलिसांकडून यापुढील काळातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा अधिक तीव्रतेने राबवल्या जातील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.







