सातारा: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत पोलिसांची बनावट वेशभूषा करून वाहनचालकांकडून पैसे उकळणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे जात असताना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली आणि कोल्हापूर येथील काही आरोपी स्वतःला पोलिस असल्याचे भासवत रात्रीच्या वेळी वर्धनगड येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ बनावट नाकाबंदी करत होते. वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली चालकांना कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याची गोपनीय माहिती पुसेगाव पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत चार पुरुष आणि तीन महिलांना अटक करण्यात आली. आरोपींकडून दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 21 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अटकेतील आरोपींचा यापूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग होता का, तसेच त्यांच्यावर इतर गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
दरम्यान, आषाढी वारीदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सातारा पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. पालखी मार्गावरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून वारकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याशिवाय पालखी सोहळ्याच्या कालावधीत सातारा जिल्ह्यातील 97 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. वारकरी, भाविक आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी पोलिसांकडून संपूर्ण पालखी मार्गावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.







