अकोला: अकोला जिल्ह्यात अवैध सावकारीच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. शेतकरी आणि गरजू नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारींनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील २८ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत कोरे धनादेश, इसार पावत्या, बाँड, खरेदीखत, करारनामे, डायऱ्या आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दोन ठिकाणीही छापे टाकण्यात आले असून, एका संचालकासह एका अडत्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ तक्रारदारांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे ११ गैरअर्जदारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. सहकार विभागाच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग आणि पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. तब्बल २०४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेणे, जमिनीच्या व्यवहारांमध्ये गैरप्रकार करणे आणि आर्थिक पिळवणूक केल्याच्या तक्रारींची तपासणी केली जात आहे.

छाप्यांदरम्यान इसार पावत्या, कोरे चेक, कोरे बाँड, मूळ आणि छायांकित खरेदीखत, विक्री पावत्या, करारनामे, गहाणखते, सातबारा उतारे, रोख वही, खातेवही आणि रोख रक्कम यांसह विविध कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित गैरअर्जदारांपैकी एक जण भाजपचा माजी पदाधिकारी असल्याचा दावा केला जात आहे. तसेच, एका प्रकरणात अडत्यामार्फत शेतकऱ्याला पैसे देऊन त्याची जमीन ताब्यात घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नसून तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार जिल्हास्तरीय समितीमार्फत संयुक्त पथके तयार करण्यात येतात. या कारवाईतून जप्त केलेल्या कागदपत्रांची सखोल तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.







