पुणे: राज्यातील 17 विधान परिषद जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपला सर्वाधिक 12 जागा, शिवसेनेला 3 जागा आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जागावाटपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ लक्षात घेऊन महायुतीतील पक्षांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ज्या भागात संबंधित पक्षाचे संख्याबळ अधिक आहे, त्या जागांवर दावा करण्याची रणनीती आखली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भाजपच्या वाट्याला 12 जागा जाणार आहेत. तर शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळू शकतात. या फॉर्म्युल्यावर महायुतीच्या समन्वय समितीत चर्चा होणार असून काही जागांवर पक्षांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या वाटपावर एकमत होऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी या जागांवर दावा सांगितल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागांवर दावा केला आहे.
तर भाजपने नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर या महत्त्वाच्या जागांवर दावा केल्याची माहिती आहे.
मात्र सध्या हा जागावाटपाचा फॉर्म्युला प्राथमिक स्वरूपात असून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे महायुतीतील अंतिम बैठकीनंतरच स्पष्ट चित्र समोर येणार आहे. या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







