PM Kisan Yojana: महाराष्ट्रातील तब्बल 90.41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा (Kisan Nidhi) एकविसावा हप्ता आज 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झाला आहे. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना नेहमीच उत्सुकता असते. दर तीन महिन्यांनी मिळणारे 2,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चाला आणि शेतीच्या गरजांना मदत करतात. यंदाचा हप्ता देखील थेट DBT प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. (Maharashtra Breaking News)

तमिळनाडूतील कोईंबतूर येथे आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता ऑनलाइन पद्धतीने वितरित केला. महाराष्ट्रात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पुणे कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे आणि कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातील कृषी विभागाचे विविध अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले.
केंद्र सरकारने आतापर्यंत दिलेल्या 20 हप्त्यांमधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण 37,502 कोटी रुपये मिळाले आहेत. आता एकविसावा हप्ता म्हणून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1,808 कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांचा हप्ता e-KYC पूर्ण न केल्यामुळे रोखला गेलेला आहे. PM-Kisan योजनेत e-KYC अनिवार्य असल्याने ही प्रक्रिया पूर्ण नसल्यास हप्ता मिळत नाही. तसेच पती-पत्नी दोघांनी अर्ज केल्यास फक्त एका व्यक्तीला हप्ता मिळतो. जमीन नोंद चुकीची असल्यास किंवा 7/12 उतारा अपडेट नसल्यासही हप्ता थांबतो.
शेतकऱ्यांना आपला हप्ता जमा झाला की नाही हे ऑनलाइन तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘Beneficiary Status’ वर क्लिक करून मोबाईल नंबर, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकल्यास हप्त्याची संपूर्ण माहिती मिळते. राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला हा हप्ता आगामी रब्बी हंगामाच्या तयारीसाठी मोठी मदत ठरणार आहे.







