जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोल गावात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गहाण ठेवलेली मोटरसायकल सोडवण्यासाठी पैसे मागण्यावरून झालेल्या वादानंतर पत्नी आणि 17 वर्षीय मुलाने करणसिंग रामसिंग पवार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करणसिंग पवार यांनी आपली मोटरसायकल गहाण ठेवली होती. ती परत मिळवण्यासाठी त्यांनी पत्नी अरुणाबाई यांच्याकडे पैशांची मागणी केली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. भांडण वाढत गेल्यानंतर त्यांचा 17 वर्षीय मुलगाही त्यात सहभागी झाला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वादाच्या वेळी अरुणाबाई यांनी घरातील दोरीच्या मदतीने पतीचा गळा आवळल्याचा आरोप आहे. त्याचवेळी मुलाने सायकलच्या पंपाने करणसिंग यांच्या डोक्यावर मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. गळा आवळल्याने आणि डोक्याला झालेल्या मारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, हा वाद अचानक झालेला नसून कुटुंबात यापूर्वीपासूनच काही कारणांवरून तणाव असल्याची माहिती समोर आली आहे. करणसिंग यांना दारूचे व्यसन असल्याचा आरोप असून, त्यातून घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांनी कुटुंबीयांना विश्वासात न घेता शेतजमीन विकल्यामुळे पत्नी आणि मुलाच्या मनात नाराजी होती. या पार्श्वभूमीवर दुचाकी सोडवण्यासाठी पैशांची मागणी केल्याने वाद अधिक चिघळला.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी पत्नी अरुणाबाई पवार आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.







