पुणे : कोंढवा परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काकडे वस्ती येथील करणी पार्किंग परिसरात एका ट्रॅव्हल्स बसमधून सुमारे 1 लाख 49 हजार 500 रुपये किमतीचा बनावट मावा जप्त करण्यात आला. या कारवाईत बसचालकासह वाहन मालकाच्या मुलाची चौकशी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-2, गुन्हे शाखेचे अधिकारी कोंढवा भागात गस्त घालत होते. त्यावेळी काकडे वस्ती परिसरातील नैनिताल ट्रॅव्हल्सच्या बसमधून बनावट मावा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित बसची तपासणी केली. बस क्रमांक AR-11-E-2001 मध्ये पांढऱ्या रंगाचा मिठा मावा आढळून आला. पोलिसांनी हा साठा ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या माव्याची किंमत 1 लाख 49 हजार 500 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात बसचालक इंदरसिंग लाडूसिंग (वय 42, रा. रामपुरा, ता. रायपूर, जि. पाली, राजस्थान) आणि वाहन मालकाचा मुलगा नरेश दिनेश नेनिवाल (वय 23, रा. इंद्र कॉलनी, बिलारा, जि. जोधपूर, राजस्थान) यांच्याकडून हा माल ताब्यात घेण्यात आला.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक-2 आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने केली. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या माव्याची तपासणी आणि त्यासंदर्भातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-3) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्यासह पोलीस हवालदार योगेश कुंभार, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, सुमित यादव, पृथ्वीराज पांडुळे आणि संदिप देवकाते सहभागी होते.
तसेच महिला पोलीस हवालदार सुरेखा साबळे, सुकेशनी आंबले आणि आरती दिवेकर, तसेच पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, अमोल गायकवाड, देविदास वांढरे आणि अमोल मुंढे यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक-2, गुन्हे शाखा, पुणे शहर आणि अन्न व औषध प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाकडून श्री. खोसे (सहायक आयुक्त, अन्न), श्रीमती सोनकांबळे, श्री. प्रतिक जाधव आणि श्री. स्नेहल येणारे (अन्न सुरक्षा अधिकारी) यांनी कारवाईत मदत केली.







