पुणे : महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढला असताना सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत मात्र पावसाने दांडी मारली आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील एका जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी पळापळ झाली. या अपघातात शाळेत शिकणारी 13 मुले जखमी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ही दुर्दैवी घटना अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील कन्नड माध्यमाच्या सोलापूर जिल्हा परिषद शाळेत घडली. सदर शाळेची इमारत सुमारे 25 वर्षे जुनी आहे. गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे शाळेचे कामकाज सुरू असताना, इमारतीची जुनी झालेली पोर्चची स्लॅब अचानक खाली कोसळली. स्लॅबचा काही भाग खाली उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि रुग्णवाहिका तात्काळ बबलाद गावात दाखल झाली. सुदैवाने, या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झालेली नाही. सर्व जखमी मुलांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुरक्षितपणे पालकांसोबत घरी सोडण्यात आले आहे.

इमारत खूप जुनी आणि जीर्ण झाल्यामुळेच हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनासह पालकांनी चिंता व्यक्त केली असून, पंचायत समिती सभापती सागर कल्याणशेट्टी यांनी या धोकादायक इमारतीची तात्काळ पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता या शाळेसाठी नवीन इमारत लवकरात लवकर उभी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.







