लातूर: लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात दोन अल्पवयीन मुलींवर त्यांच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकून आईला जाग आली. तिने पाहणी केली असता पती मुलींवर अत्याचार करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकून आई जागी झाली. तिने दिवा लावून पाहिले असता पतीचे कृत्य तिच्या लक्षात आले. तिने त्याला रोखण्याचा प्रयत्न करून जाब विचारला. मात्र, आरोपीने पत्नीला आणि मुलींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने सकाळी एका शेजाऱ्याला घडलेला प्रकार सांगितला. दोन्ही मुलींना दुखापत झाल्याचेही तिने त्यांना कळवले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित नागरिकाने जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना निनावी फोन करून माहिती दिली.

माहिती मिळताच बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने पीडित मुलींच्या आईचे समुपदेशन केले आणि जखमी मुलींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पीडितांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ६५(२), ३५१(२), ३५१(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ मधील कलम ४, ५(ड), ५(एन) आणि ६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







