पुणे : पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, आज त्याचा 11 वा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तीव्र झाले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी एमपीएससी अध्यक्षांना तातडीने हटवावे, अशी ठाम भूमिका घेतली आहे.आज अकरावा दिवस असूनही सरकारकडून अद्याप कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही.यावेळी बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.

ते म्हणाले, एमपीएससीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे सरकार विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा मित्राच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कॉलेजच्या काळापासून ते विविध पदांवर नियुक्तीपर्यंत या अध्यक्षांना नेहमीच पाठबळ दिल्याचा दावा त्यांनी केला. जर आज संध्याकाळपर्यंत सरकारने ठोस भूमिका घेतली नाही आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली नाही, तर उद्यापासून आंदोलनाचे स्वरूप पूर्णपणे बदलेल आणि सरकारला जादा अडचणींचा सामना करावा लागेल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

सत्ताधाऱ्यांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना ‘अर्बन नक्षल’ आणि पैशांसाठी आलेले लोक म्हणून हिणवले जात असल्याचा निषेध रोहित पवारांनी केला. गरिबांच्या मुलांची आणि शेतकऱ्यांच्या पोरांची सत्ताधारी थट्टा करत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. शेतकरी आणि विद्यार्थी संकटात असताना सरकार मात्र कोटी रुपयांची लँड क्रूझर खरेदी आणि लंडन दौऱ्यांवर सरकारी पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आता एमपीएससी आयोगाचे शुद्धीकरण करण्यासाठी अध्यक्षांना बडतर्फ करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारला आज संध्याकाळपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. यावर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे






